महावितरणच्या पदभरतीला मुदतवाढ ; ‘रोस्टर’ दुरुस्त होण्याची शक्यता!

0

महावितरणमध्ये सध्या मेगा भरती सुरू असून, पाच हजार ९०० पदे भरली जाणार आहेत. मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाविना (एसईबीसी) ही भरती होत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये नाराजी आहे. या भरतीसाठी २० मार्च हा अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. पण, महावितरणने अर्ज भरण्यासाठी आता एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.

या कालावधीत एसईबीसी आरक्षण लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ‘रोस्टर’ दुरुस्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरण काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महावितरणने राज्यभरात विद्युत सहायक, डिप्लोमा इंजिनिअरच्या सुमारे पाच हजार ९०० जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी डिसेंबर २०२३ मध्ये जाहिरात काढली. पण, १ मार्च २०२४ ला यासंदर्भातील ‘यूआरएल लिंक’ महावितरणने खुली करून अर्ज मागवले. यासाठी २० मार्च ही अखेरची मुदत होती. या जाहिरातीत दहा टक्के मराठा आरक्षणाचा (एसईबीसी) कोठेही उल्लेख नाही. दुसरीकडे स्वतंत्र आरक्षण लागू झाल्याने महसूल विभाग मराठा तरुणांना ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देत नाही.

त्यामुळे या पदभरतीत मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे किंवा खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावे लागत आहेत. महावितरणने आता पदभरतीसाठी महिन्याची मुदतवाढ दिली आहे. महावितरणच्या वेबसाइटवर त्याचे नोटिफिकेशन टाकले आहे. १९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. मुदतवाढ दिल्याने रोस्टर दुरुस्ती करून हे आरक्षण लागू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत महावितरण नेमका काय निर्णय घेते, याकडे लक्ष असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.