महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने २०२५ साली होणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांसाठी वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. याअंतर्गत एलिमेंटरी परीक्षा २४ व २५ सप्टेंबर रोजी तर इंटरमिजिएट परीक्षा २६ व २७ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यभरातील केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहेत. हे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळांमध्ये तयारीला वेग आला आहे.

नियमांमध्ये महत्त्वाचा बदल
पूर्वी ही परीक्षा कला संचालनालयामार्फत घेतली जात होती. मात्र २०२४ पासून नवीन नियमानुसार ह्या परीक्षा आता महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जात आहेत. ह्या बदलामुळे परीक्षा प्रक्रियेचे केंद्रीकरण झाले असून अधिक पारदर्शक आणि संगणकीकृत कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
नोंदणीची तारीख आणि पद्धत
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी २१ ते २४ जुलैदरम्यान करता येईल. तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २४ ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आली आहे. विलंब शुल्कासह २५ ते ३१ ऑगस्ट पर्यंत व अतिविलंब शुल्कासह १ ते १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. परीक्षक व समालोचकांसाठीही २१ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत नोंदणी खुली असेल.
परीक्षेचे विषय व वेळापत्रक
एलिमेंटरी परीक्षेअंतर्गत २४ सप्टेंबर रोजी वस्तूचित्र सकाळी १०.३० ते १ व स्मरणचित्र दुपारी २ ते ४ घेतले जातील. २५ सप्टेंबर रोजी संकल्पचित्र सकाळी, तर कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन दुपारी पार पडेल. इंटरमिजिएट परीक्षेत २६ सप्टेंबर रोजी स्थिरचित्र व स्मरणचित्र परीक्षा होणार असून २७ रोजी संकल्पचित्र-नक्षीकाम सकाळी, तर भूमिती व अक्षरलेखन दुपारी आयोजित करण्यात आले आहे.
परीक्षा शुल्काची रचना
एलिमेंटरी परीक्षेसाठी सामान्य शुल्क १०० रुपये असून, विलंब शुल्कासह ३०० आणि अतिविलंब शुल्कासह ६०० रुपये आहे. इंटरमिजिएटसाठी हे शुल्क अनुक्रमे २००, ६०० व ७०० रुपये आहे. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी या शुल्कात वाढ असून, एलिमेंटरीसाठी २०० ते ७०० रुपये आणि इंटरमिजिएटसाठी ४०० ते १२०० रुपये शुल्क आकारले जाईल.
वेबसाईट व ऑनलाइन प्रणाली
सर्व नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा शुल्क भरणे https://www.msbae.org.in या अधिकृत संकेतस्थळावरून करायचे आहे. केंद्रप्रमुख, शाळा प्रशासन, पालक व विद्यार्थी यांना ह्या प्रक्रियेची माहिती आणि वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सर्व कार्यप्रणाली ऑनलाईन करण्यात आली आहे.
कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा दर्जा वाढवते, तसेच कला शिक्षण क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी मूलभूत पाया घालते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेवर नोंदणी करून, पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्यावी. राज्य शासन आणि शिक्षण मंडळाची ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी ठरणार आहे.
