‘एआय’चा प्रभाव : नोकऱ्यांचा अंत की नवा आरंभ? ‘लिंक्डइन’च्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले भविष्याचे चित्र! | AI Era Begins: Jobs Redefined!

AI Era Begins: Jobs Redefined!

कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच ‘Artificial Intelligence (AI)’ आता आपल्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग बनत आहे. केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, एआयचा वापर शिक्षण, वित्तीय, बांधकाम, विपणन आणि प्रशासन अशा जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुनरावृत्तीची आणि वेळखाऊ कामे आता काही सेकंदात पूर्ण होत असल्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष अधिक मानवी निर्णयक्षमता आणि सर्जनशीलतेच्या भूमिकांकडे वळत आहे.

AI Era Begins: Jobs Redefined!

‘लिंक्डइन’ने नुकतेच देशभरातील १,९०६ व्यावसायिकांवर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की एआयमुळे काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलत चालली आहे. जे कामे पूर्वी तासन्‌तास घेत होती, ती आता काही क्षणांत पूर्ण होत आहेत. त्यामुळे कामाचा वेग वाढला असला तरी, मानवी कौशल्यांची गरज अजूनही तितकीच आहे – किंबहुना अधिक वाढली आहे.

एआयच्या प्रसारामुळे कर्मचाऱ्यांची वाटचाल आता मनुष्यकेंद्रित जबाबदाऱ्यांकडे होत आहे. उदाहरणार्थ, मनुष्यबळ (HR) विभागातील कर्मचारी आता फक्त कागदी कामांवर न थांबता ग्राहकांशी थेट संवाद साधणे आणि निर्णय घेणे यांसारख्या भूमिकांकडे वळत आहेत. वित्तीय क्षेत्रातही ‘क्लायंट इंटरॅक्शन’ आणि ‘अकाउंटिंग मॅनेजमेंट’सारख्या जबाबदाऱ्या अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत.

तंत्रज्ञान आणि यांत्रिकी क्षेत्रातील अभियंतेसुद्धा आता शिक्षण आणि कौशल्यविकासाशी निगडित क्षेत्रांकडे झुकत आहेत. व्यवसायविकास, उत्पादन व्यवस्थापन आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये मानवी विचारशक्ती आणि निर्णयक्षमता अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे या क्षेत्रांतील व्यावसायिकांची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

‘लिंक्डइन’च्या अहवालानुसार, एआयचा वापर केवळ मजकूर तयार करणे किंवा माहिती सादर करणे यापुरता मर्यादित ठेवू नये, तर त्याचा वापर नोकरी अर्ज, संशोधन, मुलाखत तयारी आणि प्रकल्प नियोजन अशा अनेक बाबींमध्ये करता येतो. एआय आणि मानवी निर्णय यांचा योग्य समतोल साधला, तर प्रगती अधिक गतीमान होते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

व्यावसायिकांमध्ये एआयबाबतचा आत्मविश्वास वाढलेला दिसून आला आहे. सर्वेक्षणातील ६२ टक्के जणांनी सांगितले की, एआयमुळे त्यांच्या कामाची उत्पादकता वाढली आणि वेळ वाचला. तर ५९ टक्के व्यावसायिकांना वाटते की, एआय भविष्यात आणखी संधी निर्माण करेल. माध्यम, अभियांत्रिकी, विपणन आणि मनुष्यबळ या क्षेत्रांमध्ये एआयच्या वापरामुळे कर्मचारी आता अधिक मूल्याधारित जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

‘लिंक्डइन इंडिया न्यूज’च्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निराजिता बॅनर्जी यांनी सांगितले की, “एआय ही कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीला गती देणारी शक्ती ठरू शकते. कौशल्यविकास, क्षमता सिद्ध करणे आणि कृत्रिम प्रज्ञा साधनांचा प्रभावी वापर या तीन घटकांवर लक्ष केंद्रित केल्यास व्यावसायिक स्पर्धेत आघाडी मिळू शकते.”

त्यांनी हेही नमूद केले की, आजच्या काळात कौशल्याधारित संधी शोधणे आणि स्वतःचे काम सातत्याने मांडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘लिंक्डइन’सारख्या व्यासपीठांवर दर आठवड्याला आपले काम शेअर केल्यास ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यातून नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतात.

Comments are closed.