सायबर गुन्हेगारांची हातचलाखी आता नव्या पातळीवर पोहोचली आहे. पूर्वी सेक्स्टॉर्शन, मोबाइल हॅकिंग, ओटीपी फसवणूक अशा पद्धतींनी सायबर क्राईम केला जात होता. मात्र पोलिसांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी या टोळ्यांनी आता विद्यार्थ्यांची बँक खाती ‘भाड्याने’ घेण्याचा नवाच फंडा सुरु केला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांना आर्थिक मदतीचं आमिष दाखवून त्यांच्या खात्यांचा वापर फसवणुकीसाठी केला जातो.

विद्यार्थ्याच्या खात्यातून २४ तासांत ३८ लाखांचे व्यवहार!
नुकतीच घडलेली घटना धक्कादायक आहे. नागपूरमधील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या आदिल धोटे याच्या खात्यात अवघ्या २४ तासांत तब्बल ३८ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. हे पैसे दिल्लीस्थित सायबर गुन्हेगार टोळीने त्यांच्या फसवणुकीतून मिळवून आदिलच्या खात्यात वळवले. त्यानंतर ते पैसे दुसऱ्याच खात्यांमध्ये वळती करून गायब करण्यात आले.
‘आम्ही तुझ्या शिक्षणासाठी पैसे देतो’ – आमिषाने विद्यार्थ्याचा विश्वासघात
ही फसवणूक सुरू झाली होती एका साध्या ओळखीने. मे महिन्यात आदिलची ओळख आर्यन आणि विशाल नावाच्या दोन तरुणांशी झाली. ‘तुझ्या शिक्षणासाठी मदत करतो, फक्त तुझे बँक खाते आम्हाला २-५% भाडे दराने दे’, असे सांगत त्यांनी त्याला भुरळ घातली. आदिलनेही शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्याचे IDFC फर्स्ट बँकेचे खाते आणि सिमकार्ड त्यांना दिले.
बँक खातं गोठलं, पोलिसांनीही तक्रार नाकारली!
अचानक लाखोंचा व्यवहार झाल्यामुळे बँकेने तत्काळ आदिलचं खातं गोठवून टाकलं. याबाबत आदिल बँकेत गेला, तेव्हा समजलं की सायबर पोलिसांकडून आलेल्या तक्रारीमुळे हे पाऊल उचलण्यात आलं. विशेष म्हणजे, तक्रार करण्यासाठी आदिल जेव्हा सायबर पोलिस ठाण्यात गेला, तेव्हा पोलिसांनी त्याची तक्रार नाकारली, हे सत्य अजूनच धक्कादायक आहे.
दिल्लीकडून ‘ऑपरेशन’ सुरू – टोळीचा मास्टरप्लान
विशाल आणि आर्यन यांनी आदिलकडून सिम घेऊन लगेच दिल्लीचा विमानप्रवास केला. त्यांनी १६ ते १७ मे या अवघ्या २४ तासांत त्याच्या खात्यात ३८ लाख रुपये वळते केले. त्याचवेळी काही रक्कम दुसऱ्या खात्यांमध्येही हलवली. हे सगळं प्रोफेशनल सायबर क्राइम रॅकेट असल्याचे स्पष्ट होते.
विशालला अटक, पोलिस आयुक्त म्हणतात – “चौकशीनंतरच बोलू”
या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी विशालला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी म्हटले की, “या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतरच अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल.”
युवकांच्या अडचणींचा गैरफायदा घेत चाललेली ठकबाजी!
या प्रकरणातून दिसून येते की, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले तरुण, विशेषतः विद्यार्थी, सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक असते. अशा टोळ्या भुरळ घालून त्यांच्या खात्यांचा वापर करून मोठ्या रकमा फिरवत आहेत आणि नंतर त्याच विद्यार्थ्यांना पोलिसांची भीती दाखवून गप्प बसवतात.
पालक व तरुणांना इशारा – आपले बँक खाते भाड्याने देणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणे!
या प्रकाराने विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक मोठा इशारा दिला आहे. आपले बँक खाते दुसऱ्याच्या ताब्यात देणे, भलेही आर्थिक गरजेमुळे का असेना, हे कायद्याने गुन्हा ठरू शकते. यामुळे भविष्यात विद्यार्थ्याच्या करिअरवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Comments are closed.