राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल १५ मेपूर्वी जाहीर करण्याची शक्यता आहे. या परीक्षांसाठी उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगाने सुरू असून, शिक्षण मंडळाच्या नियमानुसार शिक्षकांनी शाळेच्या वेळेत किमान ३५ उत्तरपत्रिका तपासण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे वेळेत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस आधी सुरू झाल्या असल्याने निकाल लवकर जाहीर करण्याचे नियोजन शिक्षण मंडळाने केले आहे. सध्या राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या विभागीय मंडळांकडून उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे.
दरम्यान, विरार येथील एका शिक्षिकेच्या घराला आग लागल्याने १७५ विद्यार्थ्यांच्या वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन (OC) विषयाच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. बोर्डाच्या नियमानुसार या विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या गुणांच्या सरासरीनुसार गुण देण्यात येणार आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख तर बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख विद्यार्थी बसले आहेत. आतापर्यंत दहावीच्या ४४ टक्के आणि बारावीच्या ४० टक्के उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. परीक्षांची अंतिम टप्प्यातील कामगिरी सुरळीत पार पडावी म्हणून उच्च शिक्षण विभाग आणि बोर्ड अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उत्तरपत्रिका तपासणी वेगाने सुरू आहे.
१७ मार्च रोजी परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करून १५ मेपूर्वी निकाल जाहीर करण्याचे शिक्षण मंडळाचे नियोजन आहे.