‘सेट’ परीक्षेच्या निकाल जाहीर करायला उशीर लागणार ! – SET Result Delayed!

SET Result Delayed!

सेट परीक्षेचा निकाल अजूनही रखडला असून, परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून यूजीसीच्या ‘सेट’ परीक्षा जूनमध्ये पार पडली, पण निकाल दोन महिन्यांनंतरही जाहीर झालेला नाही.

SET Result Delayed!राज्यातले तब्बल १ लाख १० हजार ४१२ उमेदवार या निकालाची वाट पाहतायत. नाशिक जिल्ह्यातून ७ हजार ३०५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

‘सेट’ ही पात्रता परीक्षा असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अनिवार्य आहे आणि महाराष्ट्र-गोवा या राज्यांमध्ये ती दरवर्षी घेतली जाते. निकालात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ऑफलाइन पद्धतीमुळे विलंब?

‘नेट’ परीक्षा देशभरात ऑनलाइन घेतली जाते, पण ‘सेट’ अजूनही पेन-पेपर पद्धतीने (ऑफलाइन) घेतली जाते. याचमुळे निकाल लागायला अधिक वेळ लागतो, असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या वर्षी १५ जून रोजी ४० वी सेट परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरात ४६०९ केंद्रांवर आणि एकूण ३२ विषयांत ही परीक्षा झाली.

उत्तरतालिका वेळेत, निकाल रखडला!

परीक्षेनंतर २० दिवसांत उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा होती – पण ती फोल ठरली.

‘नेट’चा निकाल २२ दिवसांत!

विशेष म्हणजे, सेटनंतर केवळ १० दिवसांनी झालेल्या ‘नेट’ परीक्षेचा निकाल फक्त २२ दिवसांत लागला. ‘नेट’ २५ ते २९ जूनदरम्यान झाली आणि २२ जुलैला निकालही जाहीर झाला.

त्यामुळं आता विद्यार्थी विचारत आहेत, “‘नेट’चा निकाल लागला, मग ‘सेट’चा का नाही?” आणि तातडीने निकाल लागावा, ही विद्यार्थ्यांची जोरदार मागणी आहे.

पुणे विद्यापीठाकडे सगळ्यांच्या नजरा

हा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काय पावलं उचलणार? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उमेदवारांचं भविष्य या निर्णयावर अवलंबून आहे.

Comments are closed.