रायगड जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातली आरोग्य व्यवस्था अगदीच बेजार झालीये. गावोगावी सुरू केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रांना डॉक्टर्स, नर्सेस आणि सेवकांची जबरदस्त कमतरता भेडसावतेय.
सध्या जिल्ह्यात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि २८८ उपकेंद्रं कार्यरत असली, तरी एकूण १३३३ मंजूर पदांपैकी तब्बल ५११ पदं अजून रिक्त आहेत. यामध्ये ८ वैद्यकीय अधिकारी देखील नाहीत.
ही केंद्रं गावाजवळ असलेल्या वस्त्यांवर लसीकरण, बाळंतपण, रोगप्रतिबंध आणि इतर आवश्यक सेवा पुरवतात. पण लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारीच नसल्यामुळे आरोग्य सेवकांवर ताण वाढलाय.
रिक्त पदांमध्ये हे मुख्य आहेत:
वैद्यकीय अधिकारी – ८
आरोग्य सेवक महिला – ३२१
आरोग्य सेवक पुरुष – ६८
सफाई कामगार – ५०
स्त्री परिचर – २१
आरोग्य सहाय्यक महिला – ३०
औषध निर्माण अधिकारी – ६
आरोग्य पर्यवेक्षक – ४
प्रशिक्षित ताई – २
गावोगावी लसीकरण, संततिनियमन, एड्स-टीबीचे नियंत्रण, बाळंतपण सेवा, आणि शाळांमधील आरोग्य तपासणी यासारख्या सेवा याच केंद्रांतून दिल्या जातात. पण स्टाफ नसल्यामुळे सगळं काम अत्यंत मर्यादित पद्धतीने चालतंय.
महिला आरोग्य सेविकांच्या भरतीसाठी परीक्षा झाली होती, पण अनेक अपात्र ठरल्यामुळे पदं रिक्त राहिली. त्यामुळे जास्तीचा भार कार्यरत कर्मचाऱ्यांवरच येतो. अधिकारी सांगतात, “सेवेवर फारसा परिणाम होत नाही,” पण सेवा देणाऱ्यांची दमछाक मात्र निश्चितच होतेय.

Comments are closed.