राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापक भरतीची प्रक्रिया रखडत चालली असून यामागे अधिकाऱ्यांची मनमानी व संबंधित मंत्र्यांची अनास्था हेच प्रमुख कारण असल्याचा आरोप होत आहे. नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने यावर तीव्र संताप व्यक्त करत १० सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री व मंत्र्यांची आश्वासने ठरली निष्फळ
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जुलै २०२५ रोजी अकृषक महाविद्यालयांतील ५,०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीस मान्यता दिली होती. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही एक ते दीड महिन्यात भरती सुरू केली जाईल असे सांगितले होते. मात्र दोन महिने उलटून गेले तरी भरतीचा अध्यादेश निघालाच नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
५ सप्टेंबरपर्यंत आदेश न झाल्यास आंदोलन
समितीने स्पष्ट केले आहे की, जर ५ सप्टेंबर २०२५ पर्यंत भरतीचा अध्यादेश प्रसिद्ध झाला नाही, तर ते १० सप्टेंबरपासून उच्च शिक्षण संचालकालय, पुणे आणि आझाद मैदान, मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडणार आहेत.
२०१२ पासून प्रलंबित भरती
राज्यात २०१२ पासून नियमित प्राध्यापक भरती बंद असल्याने असंख्य सीएचबी (CHB) प्राध्यापक १५ ते २० वर्षांपासून अल्प मानधनावर अध्यापन करत आहेत. नोकरीची आशा आणि भरतीची प्रतीक्षा यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित बनले आहे.
सीएचबी प्राध्यापकांचे हाल
भरती न झाल्याने अनेक सीएचबी प्राध्यापकांना ताणतणावामुळे आत्महत्या कराव्या लागल्या आहेत, तर काहींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अशी भयावह परिस्थिती असताना शासनाची ढिलाई आणि अधिकाऱ्यांची मनमानी संतापजनक ठरत आहे.
एनईपी राबविणे कठीण
नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) राबविण्यास सुरुवात झाली असली, तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे ते अंमलात आणणे अवघड होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
संघर्ष समितीची मागणी
प्रा. ज्योतीराम सोरटे, संघर्ष समितीचे समन्वयक यांनी सांगितले की, शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ भरतीचा अध्यादेश काढावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
शासनाची अंतिम परीक्षा
आता सर्वांचे लक्ष शासनाकडे लागले आहे. प्राध्यापक भरतीचा अध्यादेश निघतो का, की आंदोलनाला तोंड फुटते, यावर उच्च शिक्षण व्यवस्थेच्या भविष्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.