देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी 300 हून अधिक फ्रेशर्सना कामावरून कमी केल्याने कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर आता इन्फोसिसने कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम (WFH) धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
10 दिवस ऑफिसमधून काम अनिवार्य
इन्फोसिसने आपल्या उपस्थिती व्यवस्थापन प्रणालीत बदल करत कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 दिवस ऑफिसमधून काम करणे बंधनकारक केले आहे. हे नवे धोरण 10 मार्च 2025 पासून लागू होईल. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, कंपनीने आपल्या फंक्शनल हेड्सना यासंबंधी ईमेल पाठवला आहे. या हायब्रिड मॉडेलद्वारे कर्मचाऱ्यांना लवचिकता राखता येईल, असा कंपनीचा दावा आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूट
हे धोरण JL6 स्तरावरील आणि त्यावरील मॅनेजर, सीनिअर मॅनेजर, डिलिव्हरी मॅनेजर आणि सीनिअर डिलिव्हरी मॅनेजर यांना लागू होणार नाही. तसेच, उपाध्यक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही या नियमातून वगळण्यात आले आहे.
अटेंडन्स अॅपमध्ये महत्त्वाचे बदल
आतापर्यंत इन्फोसिसचे कर्मचारी मोबाईल अॅपद्वारे उपस्थिती नोंदवत होते, जिथे वर्क फ्रॉम होमचा पर्याय सहज उपलब्ध होता. मात्र, नव्या धोरणानुसार हा पर्याय आपोआप मंजूर होणार नाही. कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 10 दिवस ऑफिसमध्ये हजेरी लावल्यावरच WFH साठी अर्ज करता येणार आहे.
प्रोजेक्टच्या गरजेनुसार निर्णय
हा बदल कोणत्याही एका विभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण प्रोजेक्टची गरज लक्षात घेऊन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना आता पूर्णतः घरून काम करता येणार नाही, तर ठराविक दिवस ऑफिसमध्ये उपस्थित राहावे लागेल.