महाराष्ट्र राज्याला जागतिक कॅपेबिलिटी सेंटर (GCC) हब बनवण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले असून, मुंबईत आशियातील सर्वांत मोठे GCC उभारण्यात येणार आहे. ब्रुकफील्ड कंपनीकडून सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर हा भव्य प्रकल्प साकारला जाणार असून, त्यातून १५ हजार थेट आणि ३० हजार अप्रत्यक्ष असे एकूण ४५ हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील उच्च दर्जाची प्रतिभा, सक्षम पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ धोरणांमुळे महाराष्ट्र जागतिक कंपन्यांसाठी पसंतीचे ठिकाण ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, ANSR चे सीईओ विक्रम आहुजा आणि ब्रुकफील्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात होणाऱ्या गुंतवणुका, तांत्रिक भागीदारी आणि रोजगारनिर्मितीच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. नव्या GCC धोरणामुळे कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल आणि महाराष्ट्राची आर्थिक वृद्धी वेगाने साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी FedEx ही मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या GCC व इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मायक्रोसॉफ्टने भविष्यातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, अशी विनंती सत्या नडेला यांना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या मायक्रोसॉफ्टची भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रातच असून, आगामी काळात आणखी मोठी गुंतवणूक होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Microsoft AI Tour कार्यक्रमातही सहभाग घेतला. या कार्यक्रमात सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे सादरीकरण केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने उभारलेले हे मॉडेल देशभरासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी AI Co-Pilots विकसित करण्यावरही चर्चा झाली. मायक्रोसॉफ्टने भारतातील $17 अब्जांच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राने विकसित केलेल्या ‘Marble’ प्लॅटफॉर्ममुळे सायबर व आर्थिक गुन्हे ३–४ महिन्यांऐवजी केवळ २४ तासांत शोधणे शक्य झाले असून, यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान टळत आहे आणि गुन्हेगारांवर जलद कारवाई करता येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

Comments are closed.