राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२५–२६ करीता कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State CET Cell) MHT-CET 2025 च्या गुणांच्या आधारे ही प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे. ५ जुलैपासून अर्ज स्वीकारले जात असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या वर्षी कृषीच्या एकूण नऊ अभ्यासक्रमांकरिता राज्यभरात एकूण १७,७७६ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय कृषी महाविद्यालयांमध्ये ३,६२६ जागा आणि खासगी महाविद्यालयांमध्ये तब्बल १४,१५० जागा आहेत. त्यामुळे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि कृषी शिक्षणात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे.
प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा २१ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या अंतरिम गुणवत्ता यादीपासून सुरू होईल. त्यानंतर २६ जुलै रोजी पहिल्या फेरीतील उपलब्ध जागांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि ३० जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीवर आधारित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुढील अभ्यासक्रमांकरिता जागा निश्चित करण्यात आल्या आहेत:
- B.Sc. Agriculture (१२,१७८ जागा)
- B.Sc. Horticulture (१,१०४ जागा)
- B.Tech Agricultural Engineering (८६४ जागा)
- B.Tech Food Technology (१,४४० जागा)
- B.Tech Biotechnology (१,०४० जागा)
- Agribusiness Management (९४० जागा)
- B.Sc. Social Science (६० जागा)
- B.Sc. Forestry (८२ जागा)
- B.Sc. Fisheries Science (४० जागा)
या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी MHT-CET 2025 मध्ये सहभाग घेतलेला असावा आणि अर्ज करताना संबंधित दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा अर्ज सादर झाल्यानंतर गुणवत्ता यादीमध्ये नाव असल्यास पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला जाईल.
विद्यार्थ्यांनी याप्रक्रियेसाठी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रियेचे टप्पे वाचावेत. ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख लवकरच अधिसूचित करण्यात येईल, त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.
कृषी शिक्षणाची व्याप्ती वाढत असून, या क्षेत्रात करिअर संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कृषी पदवी अभ्यासक्रमांची निवड विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शासनाच्या पुढाकारामुळे कृषी शिक्षण अधिक सुलभ व प्रभावी बनत आहे.