राज्यातील अंगणवाड्यांमध्ये आता केवळ पोषण, आरोग्य व लसीकरणच नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भरघोस सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने अंगणवाड्यांतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘आधारशिला’ नावाचा अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लहान वयातच शिक्षणाची गोडी लागणार असून, शाळेतील प्रवेशपूर्व तयारी अधिक सुलभ होईल.
‘आधारशिला’ – केंद्राचा अभ्यासक्रम राज्यात अंमलात!
या अभ्यासक्रमाची रचना केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने केलेली असून, तो आता महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवला जाणार आहे. ‘आधारशिला बालवाटिका-१’, ‘बालवाटिका-२’ आणि ‘बालवाटिका-३’ अशा तीन टप्प्यांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जाईल. प्रत्येक वयोगटासाठी स्वतंत्र आणि वयोगटानुसार योग्य असे साहित्य अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून दिलं जाईल.
सेविकांना विशेष प्रशिक्षण देणार!
या अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शक पुस्तिका, प्रशिक्षण साहित्य, विविध क्रियावली व शैक्षणिक साधनं देण्यात येणार आहेत. त्यावर आधारित प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. यामुळे सेविका आणि पर्यवेक्षिका या दोघीही शिक्षण देण्याच्या दृष्टीने अधिक सज्ज होणार आहेत.
पहिल्या वर्गासाठी शिक्षणाची पूर्वतयारीचं लक्ष्य!
‘आधारशिला’ अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे बालकांना पहिल्या इयत्तेसाठी शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे हे आहे. त्यामुळे शाळेतील पहिली पायरी बळकट होणार असून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. संपूर्ण वर्षभर या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण अंगणवाड्यांमध्ये दिलं जाईल.
मूल्यमापन व पुढील टप्पे ठरवले जाणार!
या उपक्रमाचा प्रभाव, उपयोगिता व परिणामकारकता यांचं मूल्यमापन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) करण्यात येणार आहे. त्यानंतरच हा अभ्यासक्रम पुढे किती व्यापक प्रमाणात राबवायचा याबाबत शासन निर्णय घेईल.
३० लाख बालकांचा समावेश – १.१० लाखांहून अधिक केंद्रे सज्ज!
महाराष्ट्रात सध्या सुमारे १,१०,६३१ अंगणवाडी केंद्रांमध्ये ३ ते ६ वयोगटातील जवळपास ३० लाख बालकांना विविध सेवा पुरवण्यात येतात. आता या सेवेचा व्याप्ती शिक्षणाच्या दिशेने झपाट्याने वाढणार आहे.
२०२५-२६ पासून इयत्ता वार सुरुवात – टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५-२६ मध्ये पहिली इयत्ता, २०२६-२७ मध्ये इयत्ता २, ३, ४ आणि ६, तर २०२७-२८ मध्ये इयत्ता ५, ७, ९ आणि ११ व २०२८-२९ मध्ये इयत्ता ८, १० आणि १२ साठी केली जाईल. म्हणजेच पुढील चार वर्षांत शिक्षणपद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत.
एकात्मिक शिक्षणाची पायाभरणी – ‘आधारशिला’चं यश महत्वाचं!
बालकांच्या सुरुवातीच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी अंगणवाडी ही पहिली शाळा ठरणार असून, ‘आधारशिला’ अभ्यासक्रम त्यासाठी सक्षम पायाभरणी करणार आहे. हे शिक्षण शाळेच्या शिस्तीत न अडकता बालक-केंद्रित, खेळाच्या माध्यमातून शिकण्यावर भर देणारं असेल, हेच या उपक्रमाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.