मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता असून पुढील ३ ते ४ दिवसांत तब्बल ३००० रुपये खात्यात जमा होऊ शकतात.
निवडणूक आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता रखडला होता. मात्र नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सरकारकडून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ३१ डिसेंबरला जमा करण्यात आला. आता उर्वरित दोन महिन्यांचे पैसे मकर संक्रांतीपूर्वी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान असल्याने यावर राजकीय आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात पैसे कधी जमा होतील, याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती.
लाडकी बहीण योजना ही राज्यातील लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा थेट आर्थिक लाभ दिला जातो.

Comments are closed.