राज्यातील शैक्षणिक परीक्षांमध्ये प्रामाणिकतेचा दर्जा टिकवण्याचा प्रयत्न करत असतानाच, ‘पॅट’ परीक्षेच्या पेपरफुटीमुळे संपूर्ण शिक्षण विभाग हादरला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परफॉर्मन्स असेसमेंट टेस्ट (PAT) या परीक्षेचे पेपर अनेक यूट्युब चॅनेल्सवर लीक झाल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी SCERT कडून पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तब्बल २१ यूट्युब चॅनेल्सवर गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील शाळांमध्ये १० एप्रिलपासून पॅट परीक्षा सुरू होणार असताना, गेल्या सात दिवसांपासून काही यूट्युब चॅनेल्सवर या परीक्षेतील विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात आल्या होत्या. केवळ प्रश्नपत्रिका नाही, तर त्या कशा सोडवायच्या, कोणत्या प्रश्नाला काय उत्तर लिहायचं, याचीही माहिती व्हिडिओ स्वरूपात दिली जात होती. त्यामुळे परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत सर्व पेपर पोहोचत असल्याने परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
SCERT चे संचालक राहुल रेखावार यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस तक्रार नोंदवली असून, तपास अधिक खोलात जाऊन सुरू आहे. पोलिसांनी यूट्युबच्या विधी विभागाशी संपर्क साधून संबंधित २१ चॅनेल्स बंद करण्याची शिफारस केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गंभीर धोका ठरणाऱ्या अशा कृतींवर कठोर कारवाई होण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
मात्र, या प्रकरणात अजून एक मोठे गूढ कायम आहे. SCERT कडून प्रश्नपत्रिका यूट्युब चॅनेल्सपर्यंत पोहोचल्या तरी नेमका स्रोत काय, हे अद्याप अस्पष्ट आहे. प्रश्नपत्रिका लीक कशा झाल्या, कुठल्या स्तरावर ही माहिती बाहेर गेली, याचा तपास सुरु असला तरी तो अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे SCERT अंतर्गत यंत्रणेची कार्यपद्धती आणि गोपनीयतेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून, SCERT यामध्ये पोलीस तपासाला संपूर्ण सहकार्य करत असल्याचे रेखावार यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे असल्याने यामध्ये कुठल्याही दोषींना माफ केले जाणार नाही, असे संकेतही शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
परीक्षांची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी प्रशासनाने सर्व शाळांना आवश्यक सूचना दिल्या असून, लीक झालेल्या पेपर्सच्या आधारे परीक्षा झाल्यास त्याचा फेरविचार केला जाईल, असेही संकेत मिळत आहेत. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.
ही घटना शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना व डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आवश्यक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. परीक्षेचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी हे पाऊल आवश्यक ठरणार आहे.