जिल्हा परिषद शिक्षकांना दिलासा; तीन वर्षांपासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरच सुरू! | ZP Teachers Inter-District Transfers Soon!

ZP Teachers Inter-District Transfers Soon!

जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी असून, गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांची दीर्घ प्रतीक्षा संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ZP Teachers Inter-District Transfers Soon!

या संदर्भात ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या असल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेने दिली आहे. संघटनेनुसार, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षकांसाठी अखेर आंतरजिल्हा बदल्यांचा ‘शुभ मुहूर्त’ आला आहे.

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू न केल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार शिक्षक संघटनेने दिला होता. प्रदेशाध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत स्पष्ट भूमिका कळवली होती. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये, सर्व जिल्हा परिषदांनी सातवा टप्पा राबविण्यापूर्वी शिक्षक संवर्ग रोस्टर वेळेत अद्यतनित करावे, याचा समावेश होता.

तसेच पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये २० टक्के आणि पेसा नसलेल्या क्षेत्रांमध्ये ८० टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदलीसाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत उर्दू माध्यम शिक्षकांसाठी राखीव असलेल्या पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास ती पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित करावीत, अशीही भूमिका संघटनेने मांडली आहे.

३१ मे २०२६ पर्यंतच्या सर्व रिक्त पदांचा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी विचार करावा व यासाठी स्वतंत्र व स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामीण विकास विभागाने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही सुरू केल्यामुळे, बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

मात्र, या संपूर्ण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून पाठपुरावा सुरूच राहील, असेही प्रहार शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.