यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) हिवाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, ११, १४, १५ आणि १६ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, या परीक्षा आता २२, २३, २४ आणि २५ जानेवारी रोजी घेतल्या जाणार आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील १२१ अभ्यासक्रमांच्या परीक्षा ७ जानेवारीपासून सुरू झाल्या असून त्या ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील नियमित विद्यार्थी तसेच फेरपरीक्षार्थी या परीक्षांना बसणार असून, राज्यभरातील २६९ केंद्रांवर परीक्षा होणार आहेत.
या परीक्षांसाठी सुमारे १.४९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, विविध विषयांमध्ये मिळून ६.७९ लाखांहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी हे नोकरदार, व्यावसायिक, पोलिस, सैनिक, गृहिणी, शिक्षक आणि कामगार अशा विविध घटकांतील असल्याने वेळापत्रक बदलाचा त्यांच्या अभ्यासावर थेट परिणाम होणार आहे.
विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.