Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जव्हार तालुक्यातील सुमारे अडीच हजार महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत. दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नेटवर्कची अडचण, आवश्यक शासकीय कागदपत्रांची अनुपलब्धता तसेच अनेकांकडे मोबाईल नसणे यामुळे महिलांना ई-केवायसी पूर्ण करता आली नसल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणून या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

या योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. सुरुवातीला १८ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर २०२५ अशी मुदत देण्यात आली होती; मात्र संकेतस्थळ न उघडणे, प्रक्रिया पूर्ण न होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे मुदत वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली. बहुतांश महिलांनी ई-केवायसी केली; परंतु चुकीचे पर्याय निवडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे चार हजार महिलांची केवायसी अमान्य ठरली. राज्यभरात यावर गदारोळ झाल्यानंतर शासनाने केवायसी चुकलेल्या महिलांना पुन्हा संधी दिली.
मात्र ज्यांनी कोणत्याही कारणास्तव ई-केवायसीच केली नव्हती, अशा महिलांसाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पोर्टलवर नवीन ई-केवायसीसाठी दारे बंद झाल्याने या महिलांची योजना गमावण्याची शक्यता वाढली आहे. योजना सुरू होताना अर्ज भरण्याची संधी होती; त्यानंतर नव्या लाभार्थींना समाविष्ट करण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याची माहिती स्थानिक महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील महिलांसाठी शासनाने विशेष उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments are closed.