महिला सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरावर नवे केंद्र; शासकीय योजनांची थेट माहिती व मदत! | District-Level Women Empowerment Centers Launched!

District-Level Women Empowerment Centers Launched!

सर्वांगीण विकासाला चालना देत महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र सुरू करण्यात येणार असून, महिलांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावी मदत केली जाणार आहे. अनेक पात्र महिलांना योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे लाभापासून वंचित राहावे लागते; ही माहितीची दरी भरून काढण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

District-Level Women Empowerment Centers Launched!

या केंद्रामार्फत हिंसाचारग्रस्त व संकटग्रस्त महिलांना तातडीचा आधार, सुरक्षित वातावरणात मार्गदर्शन तसेच कायदेशीर मदत दिली जाणार आहे. रोजगारविषयक माहिती, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, आरोग्य व सुरक्षा यांसारख्या विषयांवर महिलांना सविस्तर माहिती मिळणार असून, आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केंद्राच्या कामासाठी आठ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, ते महिलांना थेट मार्गदर्शन करतील.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात हे सक्षमीकरण केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. लाभार्थी महिलांचा शोध घेणे, त्यांची पात्रता तपासणे, संबंधित योजनांची माहिती देणे, मार्गदर्शन करणे आणि लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा करणे ही सर्व जबाबदारी या केंद्रामार्फत पार पाडली जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना सुरक्षितता, आत्मविश्वास आणि स्वावलंबन मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.