यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या घटतेय. कारण एकच – शाळांमध्ये शिक्षकच नाहीत! त्यामुळे बाप-आई मुलांना खासगी शाळांकडे वळवतायत.
पवित्र पोर्टलवरून गेल्या वर्षी शिक्षकांची भरती झाली खरी, पण अजूनही ७०८ शिक्षकांची पदं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोकळीच पडलीयेत.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं, तरी वर्गात शिकवायला पूर्णवेळ शिक्षकच नाही. मुलांच्या तोंडून सरळ प्रश्न – “आमचा गुरु तरी आहे कुठं?”
शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक, सहायक शिक्षक – अशा सगळ्या संवर्गांची एकूण ४८७९ पदं मंजूर झालेली आहेत. त्यातली ४१७१ पदं कार्यरत आहेत. पण सगळ्यात जास्त म्हणजे ७०८ सहायक शिक्षकांची पदं अजूनही भरली गेलेली नाहीत.
इतर जिल्ह्यांमध्ये पवित्र पोर्टलवरून भरती होतेय, पण यवतमाळला मात्र शासनाच्या नवीन आदेशाची वाट बघावी लागतीय. त्यामुळे पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे, शिक्षकविना शाळा सुरू होण्याची वेळ आलीय.
मागच्यावर्षी ३६८ शिक्षकांची भर घातली होती. पेसा क्षेत्रात १९५ शिक्षकांना कंत्राटी तत्वावर कामावर घेतलं, पण यंदाही त्यांना तसंच चालवावं लागणार आहे.
केंद्रप्रमुखांचंही तसंच!
१८० केंद्रप्रमुख पदं मंजूर, पण त्यातली १७० अजूनही रिकामी. १० जणांना पदोन्नतीनं लावलयं. त्यामुळे अनेक शिक्षकांवर केंद्रप्रमुख पदाचा प्रभार येतोय. त्यामुळे एकाच वेळी शिकवणं आणि प्रशासन – हे दोन्ही सांभाळताना शिक्षक हवालदिल झालेत.
रिक्त पदं भरायला सरकार काहीच निर्णय घेत नाहीय, आणि कार्यरत शिक्षकांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या वाढत चालल्यात!

Comments are closed.