वाळूज एमआयडीसी परिसरातील तायो कागाकु इंडिया प्रा. लि. या कंपनीत कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या बैठकीत मोठा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सीटू मजदूर युनियनशी संलग्न कामगारांना तब्बल १६ हजार रुपयांची पगारवाढ मंजूर करण्यात आली असून, या निर्णयानंतर कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला.

या करारानुसार १ एप्रिल २०२५ पासून पगारवाढ लागू होणार असून, त्या तारखेपासून आजपर्यंतचा फरक (अॅरियर्स) देण्यास कंपनी व्यवस्थापनाने मान्यता दिली आहे. पगारवाढीबाबत कंपनी व्यवस्थापन आणि सीटू युनियन पदाधिकाऱ्यांमध्ये सखोल व सकारात्मक चर्चा झाली आणि त्यातून कामगारांच्या हिताचा मार्ग निघाला.
कराराचा कालावधी पुढील तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत शासनाचा बदलता महागाई भत्ता (DA) नियमाप्रमाणे मिळणार असून, दिवाळी बोनस म्हणून ३६ हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येणार आहे. तसेच कामगारांच्या अपघात विमा पॉलिसीत ५ लाखांची वाढ करून ती एकूण १५ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे.
या नव्या करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून एकूण १८,५०० रुपयांपर्यंत लाभ होणार असून, मागील करारातील सुविधांसह काही नवीन सुविधा देखील देण्यात येणार आहेत.
या ऐतिहासिक करारावर कंपनी व्यवस्थापनाकडून प्रवीण फिरके, योगेश पिंगळे, तर सीटू मजदूर युनियनकडून दामोदर मानकापे, आर. आर. पाटील, तानाजी पाटील, दावल अंडागळे, नीलेश दुबिले, सुभाष भराट, योगेश उकिरडे, सुदाम मेत्रे आणि बसवराज पटणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Comments are closed.