विदर्भाच्या औद्योगिक वाटचालीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा जोडला जाणार असून, पोलाद उत्पादन क्षेत्रातील नामांकित सुपर स्मेल्टर्स लिमिटेड कंपनीने विदर्भात तब्बल १० हजार कोटी रुपयांचा भव्य स्टील प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हा प्रकल्प साकारण्याची दाट शक्यता असून, यामुळे संपूर्ण विदर्भात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या गुंतवणुकीमुळे हजारो युवकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

या प्रकल्पासंदर्भात राज्याच्या उद्योग सचिवांशी सकारात्मक चर्चा झाली असून, आगामी अॅडव्हांटेज विदर्भ – खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान अधिकृत सामंजस्य करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष बाब म्हणजे, सरकारकडून थेट संपर्क न साधता सुपर स्मेल्टर्स कंपनीने स्वतःच विदर्भातील औद्योगिक संधी ओळखून असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून राज्य सरकारकडे गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला आहे.
गडचिरोलीतील सूरजागड येथे उपलब्ध असलेल्या समृद्ध लोहखनिज साठ्यांमुळे विदर्भ भविष्यात देशाचे मोठे ‘स्टील हब’ म्हणून उदयास येत आहे. जेएसडब्ल्यूसारख्या दिग्गज कंपन्यांचे प्रकल्प आधीच प्रगतिपथावर असून, आता सुपर स्मेल्टर्सच्या या नव्या गुंतवणुकीमुळे विदर्भाच्या औद्योगिक नकाशावर आणखी ठळक ठसा उमटणार आहे. स्थानिक उद्योग, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि लघुउद्योगांना याचा मोठा फायदा होणार आहे.
दिल्ली आणि कोलकाता येथे मुख्यालय असलेली सुपर स्मेल्टर्स लिमिटेड ही साई ग्रुप ऑफ कंपनीजची घटक कंपनी असून, तिची स्थापना २० जून १९९५ रोजी झाली आहे. ‘सुपरशक्ती’ या लोकप्रिय ब्रँडअंतर्गत कंपनी पोलाद उत्पादने बाजारात विक्री करते. पश्चिम बंगालमधील जमुरिया येथे कंपनीचा अत्याधुनिक एकात्मिक स्टील प्रकल्प आणि स्वतःचा वीज प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यरत असून, त्याच धर्तीवर विदर्भातही मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.

Comments are closed.