भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठं आणि विस्तृत सार्वजनिक परिवहन जाळं असून, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे सर्वात अधिक पसंतीचं माध्यम मानलं जातं. कमी खर्चात आणि आरामदायी प्रवास करताना हजारो प्रवासी दररोज ट्रेनने प्रवास करत असतात. या प्रवासात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे जेवण – ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाचं दर, त्याची गुणवत्ता आणि प्रमाण याबद्दल अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम असतो.
रेल्वे पॅन्ट्री किंवा स्टेशनवरील स्टॉल्सवरून अन्न घेताना अनेकदा प्रवाशांना “किती किंमतीला कोणतं जेवण?” याची कल्पनाच नसते. काहीजण भरमसाठ पैसे देऊन अन्न घेतात, तर काहीजण चुकीच्या प्रमाणात जेवण मिळालं तरी गप्प बसतात. हीच गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अधिकृत माहिती जाहीर केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत व्हेज मील (Veg Meal) म्हणजेच शाकाहारी थाळीचे दर आणि मेनू जाहीर केला आहे. त्यानुसार, स्टेशनवर मिळणाऱ्या व्हेज मीलची किंमत ७० रुपये, तर ट्रेनमध्ये पॅन्ट्रीमधून घेतल्यास तीच थाळी ८० रुपयांना मिळेल.
या व्हेज मीलमध्ये १५० ग्रॅम साधा भात, १५० ग्रॅम डाळ किंवा सांबार, ८० ग्रॅम दही, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम पराठा/रोटी (२ पराठे किंवा ४ रोट्या), आणि १२ ग्रॅम लोणचं यांचा समावेश असतो. यामुळे प्रवाशांना अन्नाच्या प्रमाणात स्पष्टता मिळते आणि ते आपला हक्क सांगू शकतात.
मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, कोणताही विक्रेता या निर्धारित दरांपेक्षा अधिक पैसे मागत असेल, किंवा जेवणात घटक कमी देत असेल, तर प्रवाशांना त्यांना जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही रेल्वेचं हे अधिकृत मेनूकार्ड दाखवून विक्रेत्याला योग्य प्रमाण व दरातच अन्न देण्याची मागणी करू शकता.
जर विक्रेत्यांनी यानंतरही अन्न योग्य दरात अथवा योग्य प्रमाणात दिलं नाही, तर प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत तक्रार प्रणालीत तक्रार नोंदवावी, असंही मंत्रालयाने सांगितलं आहे. तक्रार करता येण्यासाठी रेल्वेचा हेल्पलाइन क्रमांक, रेल मडाद पोर्टल किंवा मोबाइल अॅप उपलब्ध आहेत.
ही माहिती प्रवाशांच्या हितासाठी अत्यंत उपयुक्त असून, ट्रेन प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा एक सकारात्मक आणि पारदर्शक पाऊल आहे. त्यामुळे आता ट्रेनमधील प्रवासात खाद्यपदार्थांची किंमत व दर्जा याविषयी जागरूकतेनं वागणं प्रत्येक प्रवाशासाठी शक्य होणार आहे.
तर पुढच्या वेळी ट्रेनमध्ये जेवण घेताना, हे अधिकृत दर व मेनू लक्षात ठेवा आणि फसवणूक टाळा!