“भारतात इंटरनेट डेटा स्वस्त आहे म्हणून त्यावर वेळ वाया घालवू नका; उलट इंटरनेटचा वापर आपल्या कौशल्यविकासासाठी आणि जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी करा,” असा महत्त्वपूर्ण सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले.

यंदा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाने नवा विक्रम प्रस्थापित केला असून सुमारे ४.५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली. दिल्लीसह गुजरात, तमिळनाडू, छत्तीसगड आणि आसाम या राज्यांमध्येही या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी सांगितले की, शिक्षण कधीही ओझे वाटता कामा नये. आवड नसताना किंवा केवळ दबावाखाली केलेले शिक्षण जीवनात यश मिळवून देत नाही; त्यामुळे केवळ गुणांवर लक्ष केंद्रित न करता शिक्षणामुळे आपल्या आयुष्यात काय सकारात्मक बदल होतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, इंटरनेट स्वस्त असल्यामुळे अनेक विद्यार्थी गेमिंग किंवा निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवतात. गेमिंगचा वापर जर दक्षता आणि कौशल्य वाढवण्यासाठी केला तर तो उपयुक्त ठरू शकतो; मात्र पैशांसाठी जुगारासारख्या गोष्टींमध्ये सहभागी होणे टाळावे. तसेच “मी कधीही मागे वळून पाहत नाही; नेहमी पुढे काय येणार आहे याचा विचार करतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना वर्तमानात जगण्याचा आणि भविष्यासाठी सकारात्मक तयारी करण्याचा संदेश दिला.

Comments are closed.