अमेरिकेत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांमधील राजकीय तिढा न सुटल्यामुळे सुरू असलेल्या शटडाउनचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. शनिवारी अमेरिकेच्या कृषी खात्याने पूरक पोषण साहाय्य (Supplemental Nutrition Assistance Program – SNAP) या योजनेचा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानंतर मोफत अन्न वितरण केंद्रे, किराणा दुकाने आणि सरकारी धान्य वितरण केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. अमेरिकेतील सुमारे ४ कोटी २० लाख नागरिक या योजनेवर अवलंबून आहेत.
निधीअभावी सरकारी योजना ठप्प
योजनेचा निधी थांबल्यामुळे आता सामान्य नागरिकांना खासगी अन्न वितरण केंद्रे, चर्चेस आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.
कृषी खात्याच्या या निर्णयावर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याचे समजते, पण त्याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
तसेच, ट्रम्प प्रशासनाने नागरिकांच्या डेबिट कार्डमध्येही निधी जमा केलेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.
प्रमुख संस्था आणि सार्वजनिक सेवा ठप्प
शटडाउनमुळे आर्थिक मर्यादा आल्याने राष्ट्रीय संग्रहालये, ग्रंथसंग्रहालये, सांस्कृतिक दालने यांसारख्या अनेक सरकारी संस्था अनिश्चित काळासाठी बंद ठेवाव्या लागल्या आहेत.
अनेक सरकारी संकेतस्थळे आणि सार्वजनिक सेवा देखील प्रभावित झाल्या असून, फक्त आणीबाणी सेवाच सुरू आहेत.
शटडाउनला पूर्ण झाला एक महिना
अमेरिकेत सुमारे ७ लाख ३० हजार सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत.
यापैकी अनेकांचा पगार अद्याप मिळालेला नाही, तर हजारो कर्मचाऱ्यांना अनिवार्य सुट्टीवर पाठविण्यात आले आहे.
राजकीय मतभेदांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सामान्य अमेरिकन जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे.

Comments are closed.