अमेरिकेतून आलेल्या एका धक्कादायक बातमीमुळे जागतिक आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अँथ्रोपिकने आपल्या ‘क्लॉड कोवर्क’ या नव्या AI एजंटसाठी तब्बल ११ प्लग-इन्स लाँच केल्यानंतर टेक शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू झाली.

हा नवा AI असिस्टंट कायदेशीर कामे, विक्री आणि मार्केटिंगसारखी महत्त्वाची कामे पूर्णपणे स्वयंचलित करणार असल्याने पारंपरिक सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. बाजार उघडताच अमेरिका, युरोपसह भारतातील आयटी कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले असून, इन्फोसिस आणि विप्रोसारख्या दिग्गज कंपन्यांनाही मोठा फटका बसला आहे.
या परिस्थितीला ब्रोकरेज फर्म जेफरीजने ‘सासपोकॅलिप्स’ असे नाव दिले असून, सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिस कंपन्यांसाठी हा काळ प्रलयासारखा ठरू शकतो, असा इशारा दिला आहे. क्लॉडचा नवा ‘लीगल एजंट’ कागदपत्रांचे पुनरावलोकन, कंप्लायन्स तपासणी आणि कायदेशीर मसुदे तयार करण्याचे काम अत्यंत कमी खर्चात आणि वेगाने करणार आहे.
यापूर्वी ज्या कामांसाठी सेल्सफोर्स किंवा सर्व्हिसनाऊसारख्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावे लागत होते, तीच कामे आता क्लॉड थेट संबंधित सिस्टमशी जोडून स्वतः पार पाडणार आहे. परिणामी, अमेरिका आणि युरोपमधील अनेक टेक कंपन्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले.
भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा महसूल अमेरिका आणि युरोपमधील आउटसोर्सिंगवर अवलंबून असल्याने या घडामोडींचा थेट परिणाम भारतावरही झाला आहे. गुंतवणूकदारांनी भीतीपोटी आयटी शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री केली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूर्वी एआयमुळे कंपन्यांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास होता; मात्र आता एआय थेट मानवी कामांची जागा घेईल आणि आउटसोर्सिंग ऑर्डरमध्ये मोठी घट होईल, अशी भीती वाढत आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रासमोर केवळ आर्थिकच नव्हे, तर रोजगाराचेही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Comments are closed.