केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांनी NDA, NA आणि CDS परीक्षा (I) 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या सर्व परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन (पेन-पेपर) पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

NDA व NA साठी अर्ज केलेले उमेदवार एका दिवसात दोन पेपर्स, तर CDS साठी अर्ज केलेले उमेदवार तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये तीन पेपर्स देणार आहेत. ही भरती नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA), नेव्हल अकॅडमी (NA) तसेच Combined Defence Services (CDS) अंतर्गत विविध संरक्षण दलातील पदांसाठी करण्यात येणार आहे.
UPSC च्या अधिकृत सूचनेनुसार NDA व NA परीक्षा (I) 2026 ही दोन सत्रांमध्ये होणार आहे. गणिताचा पेपर सकाळी 10.00 ते 12.30 या वेळेत, तर जनरल अॅबिलिटी टेस्ट (GAT) दुपारी 2.00 ते 4.30 या वेळेत होईल.
त्याच दिवशी होणाऱ्या CDS परीक्षा (I) 2026 मध्ये इंग्रजी विषयाचा पेपर सकाळी 9.00 ते 11.00, सामान्य ज्ञानाचा पेपर दुपारी 12.30 ते 2.30, आणि प्राथमिक गणिताचा पेपर सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत घेतला जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेआधी किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक असून, गेट बंद झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही.
NDA व NA लेखी परीक्षा ही दोन वस्तुनिष्ठ (Objective) पेपर्सची असते. गणिताचा पेपर 300 गुणांचा, तर जनरल अॅबिलिटी टेस्ट 600 गुणांची असून, लेखी परीक्षेचे एकूण गुण 900 आहेत. प्रश्नपत्रिका हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांत असते.
CDS लेखी परीक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणित असे तीन वस्तुनिष्ठ पेपर्स असून प्रत्येकी 100 गुण आहेत. मात्र OTA साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना गणिताचा पेपर द्यावा लागत नाही. लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची पुढील टप्प्यात SSB मुलाखत घेतली जाते.
NDA व CDS या दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग प्रणाली लागू आहे. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जातील, तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी प्रश्न सोडवताना काळजी घेण्याचा सल्ला UPSC कडून देण्यात आला आहे.
या परीक्षांद्वारे NDA व NA परीक्षा (I) 2026 अंतर्गत सुमारे 390 पदे, तर CDS परीक्षा (I) 2026 अंतर्गत अंदाजे 450 पदे भरली जाणार असून, अंतिम पदसंख्या सेवांच्या गरजेनुसार बदलू शकते. परीक्षा पूर्वी प्रवेशपत्रे UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याने उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाइट तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.