मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यूपीएससी व एमपीएससीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘महाज्योती’ने प्रशिक्षणाच्या जागांमध्ये तब्बल १४०० ची वाढ केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने पूर्णतः मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या घटकांतील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती अनेक वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन व प्रशिक्षण देत आहे. याआधी यूपीएससीसाठी केवळ १०० तर एमपीएससीसाठी ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होती.
मात्र, अलीकडच्या काळात राज्यभरातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने महाज्योतीकडील प्रशिक्षणासाठी मोठी मागणी निर्माण झाली होती. यासंदर्भात विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी शासनाकडे सातत्याने निवेदने सादर केली होती. महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनीही जागावाढीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून महाज्योती प्रशासनाने प्रशिक्षण जागावाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. त्यानंतर २० जानेवारी २०२६ रोजी महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत यूपीएससीसाठी ४०० तर एमपीएससीसाठी १,००० जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तसेच महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिली.
या निर्णयामुळे मागास प्रवर्गातील हजारो गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या सर्वोच्च सेवांपर्यंत पोहोचण्याची नवी संधी मिळणार असून, स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात महाज्योतीची भूमिका अधिक मजबूत होणार आहे.

Comments are closed.