देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. Union Public Service Commission (UPSC) ने नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२५ चा अंतिम निकाल ६ मार्च रोजी जाहीर केला. यंदाच्या निकालात अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरे, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यावर्षीच्या टॉप-१० यादीत राघव झुनझुनवाला, ईशान भटनागर, झीनिया अरोरा, ए.आर. राजा मोहद्दीन, पक्षल सेक्रेटरी, आस्था जैन आणि उज्ज्वल प्रियंक यांचाही समावेश झाला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ९५८ उमेदवार नागरी सेवा परीक्षेत यशस्वी ठरले असून विविध केंद्रीय सेवांसाठी त्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. यापैकी ३४८ उमेदवारांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे.
या परीक्षेची पूर्व परीक्षा २५ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती, तर मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडली. त्यानंतर अंतिम टप्प्यातील व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) प्रक्रिया ५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात आली. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. सर्व मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
आयोगाच्या माहितीनुसार, यंदा ९५८ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यात १८० उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), ५५ उमेदवार भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि १५० उमेदवार भारतीय पोलिस सेवा (IPS) यांसाठी निवडले गेले आहेत. याशिवाय इतर विविध केंद्रीय सेवांसाठीही उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
IAS पदांसाठी आरक्षणाचे वितरण पाहिले तर एकूण १८० पदांपैकी ७४ पदे अनारक्षित, २८ अनुसूचित जाती, १३ अनुसूचित जमाती, ४७ ओबीसी आणि १८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी UPSC मार्फत नागरी सेवा परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. या प्रक्रियेतून IAS, IPS, IFS यांसह विविध केंद्रीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

Comments are closed.