यूपीएससीमार्फत २०२५ साली कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क विभागात नवीन पदभरती जाहीर झाली आहे. या भरतीमुळे केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत काम करण्याची उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे.
या प्रक्रियेत एकूण १०२ पदे भरली जाणार असून, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १३ डिसेंबरपासून सुरू होऊन १ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ट्रेडमार्क एक्झामिनर पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १ जानेवारी २०२६ रोजी २१ ते ३५ वर्षे असून, राखीव प्रवर्गांना शासन नियमानुसार सूट लागू आहे.
या भरतीत सर्वाधिक म्हणजे १०० पदे ट्रेडमार्क व भौगोलिक निर्देशांक परीक्षकांसाठी राखीव आहेत. याशिवाय परीक्षा सुधारणा विभागात उपसंचालकांची दोन पदेही भरली जाणार आहेत. बौद्धिक संपदा आणि प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे.

Comments are closed.