ऑगस्ट २०२५ मध्ये ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (UPI) द्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या तब्बल २० अब्जांहून अधिक झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत झालेल्या व्यवहारांची आर्थिक किंमत २४.८५ लाख कोटी रुपये इतकी प्रचंड आहे.

जुलै व मे महिन्याचे विक्रम
जुलै २०२५ मध्ये UPI व्यवहारांची रक्कम २५.०८ लाख कोटी रुपये इतकी होती. यापूर्वी मे महिन्यात सर्वाधिक म्हणजे २५.१४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार नोंदवले गेले होते. मात्र, व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत जुलैनेच आघाडी घेतली होती, कारण त्या महिन्यातील व्यवहारांची संख्या १९.४७ अब्ज इतकी होती.
वार्षिक तुलनात्मक वाढ
NPCI च्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये २०.६० लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. त्याच्या तुलनेत यंदा म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये व्यवहारांत २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. व्यवहारांच्या संख्येत तर तब्बल ३४ टक्क्यांनी वाढ होऊन ती १४.९ अब्ज वरून थेट २०.०१ अब्ज पर्यंत पोहोचली आहे.
दररोजची जबरदस्त गती
या महिन्यातील सरासरी व्यवहार रक्कम दररोज ८०,१७७ कोटी रुपये इतकी होती. तर सरासरी व्यवहारांची संख्या रोजच्याच दिवशी ६४.५ कोटी इतकी होती. या आकडेवारीवरून UPI ची लोकप्रियता आणि सर्वसामान्यांच्या जीवनातली त्याची दैनंदिन गरज स्पष्ट होते.
सात देशांमध्ये विस्तारलेला UPI
UPI प्रणाली आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. सध्या यूएई, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस या सात देशांमध्ये ती कार्यरत आहे. विशेष म्हणजे फ्रान्समध्ये UPI सुरू झाल्यामुळे युरोप खंडात या डिजिटल क्रांतीचे पाऊल पडले आहे. यामुळे फ्रान्समध्ये प्रवास करणाऱ्या किंवा वास्तव्यास असलेल्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय व्यवहार अधिक सोयीस्कर झाले आहेत.
ग्रामीण भागातही वेगाने वाढ
स्पाइस मनीचे सीईओ दिलीप मोदी यांनी सांगितले की, “ऑगस्टमध्ये २०.०१ अब्ज UPI व्यवहार होणे हा मोठा टप्पा आहे. ३४ टक्क्यांची वाढ आणि दरमहा होत असलेली स्थिर वाढ हे दाखवते की डिजिटल पेमेंट्स फक्त शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातही झपाट्याने पसरत आहेत. आता डिजिटल व्यवहार हा लाखो लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे.”
भारताचा जागतिक ठसा
आजमितीला देशातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी तब्बल ८५ टक्के व्यवहार UPI द्वारे होतात. एवढेच नव्हे तर जागतिक स्तरावर होणाऱ्या रिअल-टाइम डिजिटल पेमेंट्सपैकी जवळपास ५० टक्के व्यवहार UPI द्वारे होतात. यावरून भारताची डिजिटल पेमेंट क्रांती आता जगालाही दिशा दाखवत असल्याचे दिसते.
छोट्या खर्चांपासून ते मोठ्या रकमेपर्यंत
UPI द्वारे ग्राहकांकडून दैनंदिन जीवनातील लहान खर्च — जसे की दूध, जेवण, डेटा पॅक यासाठी व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. त्याच वेळी कोट्यवधी रुपयांचे व्यावसायिक व्यवहारही याच प्रणालीद्वारे पार पडत आहेत. अशा प्रकारे छोट्या ते मोठ्या प्रत्येक आर्थिक गरजेसाठी UPI आता सर्वाधिक वापरली जाणारी व्यवहार प्रणाली ठरली आहे.

Comments are closed.