Maharashtra State Road Transport Corporation (एसटी महामंडळ) कडून सुरू करण्यात आलेली यूपीआय पेमेंट सुविधा प्रवाशांना सोयीची वाटत असली, तरी प्रत्यक्षात अनेक तांत्रिक अडचणींमुळे वाहक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क समस्या, सर्व्हर डाऊन होणे किंवा मशिनमधील बिघाड यामुळे यूपीआय व्यवहार पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेकदा प्रवाशांच्या खात्यातून पैसे वजा होतात, पण मशिनवर व्यवहार दिसत नसल्याने तिकीट निघत नाही, त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होतात.

एसटी महामंडळाने जानेवारी २०२५ पासून कॅशलेस व्यवहारासाठी अँड्रॉइड आधारित ई-तिकीट मशिन (ETIM) उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेमुळे सुट्ट्या पैशांवरील वाद कमी झाले असले, तरी आता नवीन अडचणी पुढे येत आहेत. व्यवहार पूर्ण झाल्याचा सिग्नल मिळेपर्यंत तिकीट निघत नाही, त्यामुळे प्रवाशांना पुन्हा रोख पैसे देण्यास सांगितले जाते. “पैसे आधीच कापले, मग पुन्हा का द्यायचे?” असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होतो.
रिफंडसाठी मशिनवरील पर्याय उपलब्ध असला तरी, पैसे परत मिळण्यात विलंब होतो. कस्टमर केअरशी संपर्क साधताना देखील प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महिन्यातून अनेक वेळा अशा समस्या येत असल्याने वाहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. सर्व्हर डाऊन असल्यास आधीच सूचना मिळावी, जेणेकरून रोख व्यवहार करता येतील, अशी वाहकांची मागणी आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे एसटी प्रवासातील यूपीआय सुविधा सध्या डोकेदुखी ठरत आहे.

Comments are closed.