मुंबई विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय; ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा कायमस्वरूपी बंद! | 304 University Exams Permanently Discontinued!

304 University Exams Permanently Discontinued!

मुंबई विद्यापीठाने परीक्षा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने मोठा निर्णय घेतला असून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील तब्बल ३०४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. अनेक अभ्यासक्रमांमध्ये गेल्या दोन ते तीन शैक्षणिक वर्षांत एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झाली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

304 University Exams Permanently Discontinued!

विद्यापीठाच्या माहितीनुसार, शून्य नोंदणी असलेल्या १२५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा निष्क्रिय घोषित करण्यात आल्या आहेत. यात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या २३, मानवविज्ञान शाखेच्या १५, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या ४२ तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या ४५ परीक्षांचा समावेश आहे. भविष्यात संबंधित अभ्यासक्रमांसाठी अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्या परीक्षांची प्रक्रिया विद्यापीठाच्या नियमानुसार पुन्हा सुरू केली जाईल, अशी तरतूद ठेवण्यात आली आहे.

याशिवाय, दहा वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या १७९ अभ्यासक्रमांच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा घेतल्या जाणार नाहीत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ८६, मानवविज्ञान शाखेच्या ३८, आंतरविद्याशाखीय ४५ आणि विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या १० परीक्षांचा समावेश आहे.

विद्यार्थी संख्येअभावी किंवा अभ्यासक्रमांच्या बदलत्या स्वरूपामुळे कालबाह्य ठरलेल्या परीक्षांना पूर्णविराम देऊन सध्याच्या मागणी असलेल्या अभ्यासक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे परीक्षा यंत्रणेवरील प्रशासकीय ताण कमी होणार असून, व्यवस्थापन अधिक सुसूत्र आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.