देशभरासाठी एकसमान आयुष्मान कार्ड! महाराष्ट्रात २० डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम! | Unified Ayushman Card Drive till December 20!

Unified Ayushman Card Drive till December 20!

देशभरातील जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनांचे लाभ एका एकसमान ‘को-बॅण्डेड आयुष्मान कार्ड’ द्वारे मिळावेत, यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात १ ते २० डिसेंबरदरम्यान विशेष वितरण मोहीम राबवली जात आहे. राज्यभरातील महापालिका क्षेत्रांना विशेष आयुष्मान कार्ड शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय शासकीय व खासगी रुग्णालयांना दर महिन्याला किमान एक शिबिर घेणे बंधनकारक केले आहे.

Unified Ayushman Card Drive till December 20!

हे नवीन राष्ट्रीयस्तरावरील एकत्रित कार्ड महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक ठरणार आहे. ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड असणे अनिवार्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या मोहीमेसाठी आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानचालक आणि आपले सरकार केंद्रातील कर्मचारी घराघरात जाऊन आयुष्मान कार्ड तयार करतील. प्रत्येकाला दररोजची उद्दिष्टे देऊन काम वेगात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महात्मा फुले योजनेत नियुक्त ‘आरोग्य मित्रांनाही’ कार्ड निर्मितीची जबाबदारी दिली आहे.

महापालिका क्षेत्रात पत्ते अपूर्ण असल्याने काही अडचणी येत असल्या तरी, त्या दूर करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचा डेटाबेस वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारीदेखील या योजनेंतर्गत पात्र असून, स्वतःचे आणि कुटुंबीयांचे आयुष्मान कार्ड काढणे आवश्यक आहे.

या विशेष मोहिमेमुळे राज्यातील लाखो नागरिकांना अधिक सुलभ, वेगवान आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आरोग्य ओळखपत्र उपलब्ध होणार आहे.

Comments are closed.