कृषी विभागाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत असतानाही नाशिक विभागातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेस पात्र असलेल्या नाशिक विभागातील ११ लाख १ हजार ८२३ शेतकऱ्यांपैकी फक्त ९ लाख ४६६ शेतकऱ्यांनीच फार्मर आयडी काढला आहे. परिणामी उर्वरित १८.५५ टक्के, म्हणजेच तब्बल २ लाख ४ हजार ३५७ शेतकरी फार्मर आयडी नसल्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

शासनाने कोणत्याही शासकीय योजनेचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. त्यामुळे फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना केवळ पीएम किसानच नव्हे तर इतरही अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. अॅग्रीस्टॅक प्रकल्पअंतर्गत शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यात येते. नाशिक विभागात एकूण २६ लाख ६२ हजार ५१७ खातेदार शेतकरी असून, त्यापैकी ११ लाख १ हजार ८२३ शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र यातील केवळ ८२ टक्के शेतकऱ्यांचीच फार्मर आयडी नोंदणी पूर्ण झाली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी पाहता नाशिक जिल्ह्यात ४ लाख ३२ हजार ९६१ लाभार्थ्यांपैकी ३ लाख ६६ हजार ५०८ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असून, ६९ हजार ४५३ शेतकरी अजूनही आयडीविना आहेत. धुळे जिल्ह्यात १ लाख ५७ हजार २९८ पैकी ३७ हजार ६३७, नंदुरबारमध्ये १ लाख ५ हजार १२९ पैकी ३२ हजार ५९, तर जळगाव जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४३५ पैकी ६५ हजार २०८ शेतकरी फार्मर आयडी नसलेले आहेत. एकूण मिळून २ लाख ४ हजार ३५७ शेतकरी आजही फार्मर आयडीअभावी लाभापासून दूर आहेत.
विशेषतः सुरगाणा, नाशिक, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, नावापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा आणि अक्राणी या तालुक्यांमध्ये फार्मर आयडी काढलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांत फार्मर आयडी नोंदणीचे प्रमाण तुलनेने समाधानकारक असल्याचे दिसून येते. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीचे २१ हप्ते वितरित करण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी काढावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.