‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा २०२५’चा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. राज्य परीक्षा परिषदेकडं निकालाच्या प्रक्रियेचं काम सुरू आहे, पण विद्यार्थ्यांना अजून थोडी वाट बघावी लागणार, असं अधिकृत संकेतस्थळावर लवकरच माहिती येणार असल्याचं सांगण्यात आलं.
मे-जून २०२५ मध्ये राज्यात २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. दिवसाला तीन सत्रं अशा पद्धतीनं आठ दिवसांमध्ये परीक्षा झाली. दोन लाख २८ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलं होतं, आणि त्यापैकी दोन लाख ११ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
बी.एड आणि डी.एल.एडच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्यांनाही यंदा परीक्षेला बसण्याची संधी मिळाली होती. त्यांना आवश्यक ते मार्कशीट किंवा इतर कागदपत्र परीक्षा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सादर करणं बंधनकारक होतं.
मात्र या व्यावसायिक परीक्षांचे निकाल विविध वेळांवर लागल्यामुळे टेट निकाल तयार करताना माहिती संकलनात वेळ जातोय. डीएलएडचा निकाल पाच ऑगस्ट रोजी लागला. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या निकालाच्या प्रक्रियेवर सध्या काम सुरू आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळवलं की, टेट निकाल लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.

Comments are closed.