महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २३ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चा निकाल २ फेब्रुवारीला जाहीर केला. मात्र हा निकाल जाहीर होताच मोठा वाद निर्माण झाला आहे. एकूण परीक्षार्थींमधून केवळ ५०,३६९ उमेदवार पात्र ठरल्याने अनेक उमेदवारांनी निकालावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परीक्षा परिषदेच्या चुकीच्या उत्तरांमुळे अनेक उमेदवार फक्त एक-दोन गुणांनी अनुत्तीर्ण झाल्याचा आरोप होत आहे.

उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, अनेक प्रश्नांची उत्तरेच परीक्षा परिषदेकडून चुकीची देण्यात आली असून, असे आक्षेपार्ह प्रश्न रद्द न करता थेट निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे परीक्षा परिषदेने सुधारित निकाल तातडीने जाहीर करावा, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यासह आंदोलन छेडण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. याबाबत शिक्षणमंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह तक्रार करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या परीक्षेला ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार बसले, त्यापैकी २८,९३९ उमेदवार गैरहजर राहिले. निकालात ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण, तर ३६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. एकूण निकालाची टक्केवारी केवळ ११.२८ टक्के इतकी लागली आहे. जवळपास चार लाख उमेदवार नापास होण्यामागे परीक्षा परिषदेची चुकीची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
विशेषतः पेपर-२ मधील सामाजिक शास्त्र व मानसशास्त्र विषयातील अनेक प्रश्न वादग्रस्त ठरले आहेत. ‘पुरोगामी निरोधन’सारख्या संज्ञा, उद्योगांचे प्रकार, पाठ्यपुस्तकात नसलेले संदर्भ, तसेच मानसशास्त्रीय घटकांबाबत दिलेली उत्तरे चुकीची असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. प्रश्न क्रमांक ६६, ६८, १०० आणि १२९ बाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.
उमेदवारांची मागणी आहे की, सर्व संदिग्ध व आक्षेपार्ह प्रश्न रद्द करून त्यांचे गुण वजा न करता सरसकट गुणवाढ द्यावी. चुकीचे प्रश्न वगळून उरलेल्या प्रश्नांच्या आधारे सुधारित सूत्र वापरून निकाल जाहीर केल्यास, एक-दोन गुणांनी नापास झालेले अनेक उमेदवार पात्र ठरू शकतील.
दरम्यान, टीईटी आणि टीएआयटी परीक्षांमधून राज्य परीक्षा परिषदेला कोट्यवधी रुपयांचे शुल्क मिळत असताना, परीक्षा पारदर्शक व अचूक घेण्याची जबाबदारीही तिचीच आहे. मात्र वारंवार होणाऱ्या चुका लाखो उमेदवारांचे भवितव्य धोक्यात घालत असल्याची भावना तीव्र होत आहे. या गंभीर प्रश्नांकडे शिक्षणमंत्री दादा भुसे आणि प्रशासकीय यंत्रणेने लक्ष न दिल्यास, राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा उमेदवारांनी दिला आहे.

Comments are closed.