टीईटी पेपरफुटीचा मोठा स्फोट! तपास परराज्यात पोहोचला; पाच बाहेरील आरोपींचा शोध वेगवान! | TET Leak Probe Expands Across States!

TET Leak Probe Expands Across States!

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आता महाराष्ट्राबाहेरही पोहोचली असून, तपासात परराज्यातील पाच संशयितांची नावे उघडकीस आली आहेत. बिहारमधील रितेश कुमार, ललित कुमार, सलाम, महंमद अशा व्यक्तींचा या रॅकेटशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे विशेष पथक मध्यरात्रीच बिहारकडे रवाना झाले आहे.

TET Leak Probe Expands Across States!

कागल तालुक्यातील सोनगे येथील फर्निचर मॉलमध्ये परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका देण्यासाठी बोलावण्यात आले असताना पोलिसांनी अचानक छापा टाकला होता. या कारवाईत १९ जणांना अटक झाली असून आणखी सात जणांचा शोध सुरू आहे. यापैकी पाच जण परप्रांतीय आहेत आणि त्यांनीच पेपर छपाई केंद्रातून प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचा संशय आहे.

कराडचा मुख्य आरोपी महेश गायकवाड (वय ४०) पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीनुसार तपास वेग घेत आहे. तो २०२३ पासून पेपरफुटीचे रॅकेट चालवत असल्याचा अंदाज तपासात पुढे येत आहे. त्याचे सातारा, कोल्हापूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांतही संपर्क जाळे असल्याची शंका आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित राधानगरी तालुक्यातील महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य आणि बिद्री येथील सीएचबीधारक प्राध्यापक यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाने संस्थांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर निलंबनाची प्रक्रिया गतीमान झाली.

छाप्यात मिळालेल्या १८० विद्यार्थ्यांच्या यादीवरून ‘लाभार्थी’ विद्यार्थ्यांवरही तपास सुरू आहे. पेपर मिळवण्यासाठी किती पैसे घेतले गेले, कॉल रेकॉर्डमधून कोणाशी संपर्क झाला, अशा सर्व बाबींची चौकशी होत आहे.

या प्रकरणातील १९ संशयितांना अटक केली असून १७ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केल्याने शनिवारी सुनावणी होणार आहे. पोलिस या जामिनाला जोरदार विरोध करण्याची तयारी करत आहेत.

Comments are closed.