राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केला आहे. पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवर पदोन्नतीसाठी टीईटीसह आवश्यक इतर सर्व अर्हता पूर्ण असणे अनिवार्य असल्याचे विभागाने ठामपणे नमूद केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार, सेवेत कार्यरत असलेले तसेच पदोन्नती इच्छिणारे शिक्षक टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, निवृत्तीला पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीमधून सूट देण्यात आली आहे. तरीही, अशा शिक्षकांना पदोन्नती हवी असल्यास त्यांनाही टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.
न्यायनिर्णय लागू झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांची मुदत टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात आली आहे. या कालावधीत टीईटी अट पूर्ण होईपर्यंत संबंधित पदांवर पदोन्नती देता येणार नाही, असे शिक्षण विभागाच्या अवर सचिव शरद माकणे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) व केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे पुढील मार्गदर्शनासाठी विचारणा करण्यात आली असून त्यांचे अभिप्राय अद्याप प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील टीईटी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण शिक्षकांची सविस्तर माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण संचालकांनीही सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. २०११ पूर्वी व नंतर नियुक्त झालेले शिक्षक, टीईटी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण शिक्षक, तसेच टीईटीमधून सूट मिळालेले शिक्षक अशा विविध गटांनुसार माहितीचा अहवाल तयार करावा लागणार आहे.
एकूणच, शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी हा आता टाळता न येणारा निकष ठरला असून, पात्र शिक्षकांनाच पुढील पदोन्नतीचा मार्ग खुला होणार आहे.

Comments are closed.