टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) संदर्भात राज्यात मोठी हालचाल सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा अनिवार्य केल्यामुळे यंदा या परीक्षेसाठी विक्रमी प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या माहितीनुसार, यंदा तब्बल ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी अर्ज केला आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत १ लाख २१ हजारांनी जास्त आहेत.

या वर्षी राज्यातील सर्व कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा देणे आवश्यक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सेवेत असलेल्या शिक्षकांनी दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शिक्षकवर्गामध्ये या परीक्षेबाबत मोठी उत्सुकता आणि ताण दिसून येत आहे.
टीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट येत्या १० नोव्हेंबरपासून राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. तसेच, २३ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा राज्यभरातील १,४२० परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. मागील वर्षी ही परीक्षा केवळ १,०२३ केंद्रांवर घेण्यात आली होती.
दरम्यान, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यामुळे निवडणूक प्रशिक्षणाचे वेळापत्रक टीईटी परीक्षेशी तडजोड होऊ नये म्हणून राज्य परीक्षा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. परिषदेने २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी शिक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी निवडणूक प्रशिक्षण आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान टीईटी परीक्षा घेताना अशाच प्रकारे समन्वय साधण्यात आला होता. त्या वेळी निवडणूक प्रशिक्षणाची सत्रे शिक्षक पात्रता परीक्षेनंतर इतर तारखांना घेण्यात आली होती. त्यामुळे यंदाही परीक्षा आणि निवडणूक प्रक्रिया या दोन्हींचे नियोजन सुरळीतपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.