महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चा अंतिम निकाल मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील ४.७५ लाखांहून अधिक उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा टीईटीचा उत्तीर्णतेचा टक्का मागील वर्षाच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सेवेत असलेल्या तसेच नव्याने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच निर्णयामुळे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि १४२० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली.
परीक्षेनंतर उत्तरसूची जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारे अंतरिम निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली. आता अंतिम निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, प्रश्नपत्रिकेतील काही चुकीच्या प्रश्नांचे गुण वजा करून सुधारित निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे उत्तीर्णतेच्या गुणोत्तरात बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सीटीईटी परीक्षा जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रशिक्षणाच्या तारखेशी जुळत असल्याने ती पुढे ढकलावी, अशी मागणी होत असताना, सीटीईटीपूर्वीच टीईटीचा अंतिम निकाल जाहीर करावा, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने वेळेत तयारी पूर्ण करत ३ फेब्रुवारीला अंतिम निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नोकरी टिकविण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सेवेत कार्यरत असलेले अनेक शिक्षकही टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अखेर मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने, आपण उत्तीर्ण झालो की नाही, याचा निर्णय उमेदवारांना कळणार आहे, आणि टीईटीच्या प्रतीक्षेचा हा महत्त्वाचा टप्पा संपणार आहे.

Comments are closed.