महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. मात्र, प्रश्नपत्रिकांमध्ये झालेल्या प्रिंटिंग त्रुटींमुळे काही प्रश्न रद्द करण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे.
यामुळे संबंधित विषयांच्या उत्तीर्णतेच्या गुणांमध्ये व टक्केवारीत बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रामुख्याने इयत्ता सहावी ते आठवीसाठीच्या पेपर क्रमांक दोन मध्ये हा बदल करण्यात आला असून, गणित–विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांतील काही प्रश्न रद्द झाले आहेत.
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या गणित–विज्ञान विषयातील ४ प्रश्न, उर्दू माध्यमातील ८ प्रश्न, तर कन्नड माध्यमातील सर्वाधिक १२ प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. तसेच तेलगू माध्यमातील गणित–विज्ञान विषयातील काही प्रश्नही बाद करण्यात आले आहेत.
अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना आता कोणत्याही प्रकारचे आक्षेप नोंदवता येणार नाहीत. मात्र, रद्द झालेल्या प्रश्नांमुळे उमेदवारांचे अंतिम गुण बदलणार असून, त्याचा थेट परिणाम TET उत्तीर्णतेवर होणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांचे निकाल बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.