राज्यातील सर्व सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा आता अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, प्रत्येक शिक्षकाने दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे, अन्यथा त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते.
या निर्णयानंतर टीईटी परीक्षेसाठी अर्जदारांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १.२१ लाखांनी वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार असून, १० नोव्हेंबरपासून हॉलतिकीट डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. यंदाची टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. मागील वर्षी या परीक्षेसाठी ३.५३ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि १,०२३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली होती.
यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या सक्तीमुळे ४.७५ लाखांहून अधिक उमेदवारांनी टीईटीसाठी अर्ज केले आहेत. त्यांची परीक्षा १,४२० परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की हॉलतिकीटशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे सर्व उमेदवारांनी वेळेत आपले हॉलतिकीट डाउनलोड करून ठेवावे.

Comments are closed.