राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरामुळे, टीईटीच्या अर्जांसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता उमेदवार ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतील.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील सर्व व्यवस्थापन शाळा, परीक्षा मंडळाच्या शाळा, सर्व माध्यमांच्या अनुमानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ या वर्गांसाठी शिक्षक आणि शिक्षण सेवक पदांवर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
ही परीक्षा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. पेपर १ सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल.
पूर्वी उमेदवारांना १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती, पण काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे ऑनलाइन अर्ज करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे परीक्षा परिषदेने अर्ज भरण्याची नवीन अंतिम तारीख ९ ऑक्टोबर निश्चित केली आहे.
आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले की, यानंतर कोणत्याही परिस्थितीत आणखी मुदतवाढ केली जाणार नाही.

Comments are closed.