टीईटी उत्तरसूची जाहीर!-TET Answer Key!

TET Answer Key!

राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता चाचणीची (टीईटी) अधिकृत उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेदरम्यान नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर झालेल्या गंभीर गोंधळाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर न झाल्याने संबंधित उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या केंद्रावरील सुमारे साडेतीनशे उमेदवारांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे.

TET Answer Key!२३ नोव्हेंबर रोजी राज्यभर टीईटी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेला ४ लाखांहून अधिक उमेदवार उपस्थित होते. परीक्षेनंतर अवघ्या महिन्यात उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर २७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन हरकती व सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, नाशिकमधील दिंडोरी रोडवरील एका परीक्षा केंद्रावर इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना चुकून मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा गोंधळ लक्षात येऊनही बराच वेळ योग्य प्रश्नपत्रिका देण्यात आल्या नाहीत. अखेरीस कमी वेळेतच परीक्षा सोडवण्याची सूचना दिल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

या घटनेचा अहवाल परीक्षा परिषदेकडे पाठवण्यात आला असून, संबंधितांची चौकशीही पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. तरीही, महिनाभर उलटून गेल्यानंतरही कोणताही ठोस निर्णय जाहीर न झाल्याने उमेदवारांवरील तणाव वाढला आहे. लवकरात लवकर न्याय्य निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

Comments are closed.