अमेरिकेतील आघाडीची ईव्ही निर्माता कंपनी टेस्ला आता भारतात प्रवेशासाठी तयारी करत आहे. कंपनीने व्यवसाय कार्यचालन विश्लेषक आणि ग्राहक तज्ज्ञांसह अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतील टेस्लाच्या संभाव्य योजनांबाबत चर्चा रंगली आहे.
मुंबई उपनगरांसाठी मोठी भरती!
- सेवा सल्लागार
- सेवा तंत्रज्ञ
- सेवा व्यवस्थापक
- विक्री व ग्राहक समर्थन तज्ज्ञ
- स्टोअर व्यवस्थापक
- पर्यवेक्षक, वितरण विशेषज्ज्ञ, अंतर्गत विक्री सल्लागार
अधिकृतरित्या टेस्लाकडून कोणताही स्पष्ट संकेत मिळालेला नसला तरी, भारतीय बाजारपेठेतील प्रवेशासाठी ही महत्त्वपूर्ण पावलं असू शकतात. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच व्हाईट हाऊस येथे भेट झाली होती. यानंतर टेस्लाच्या भारतातील योजनांबाबत वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
ईव्ही धोरण आणि टेस्लाचा भारतात जम बसवण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने नव्या ईव्ही धोरणांतर्गत ५० कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांसाठी आयात शुल्क सवलत जाहीर केली आहे. हे धोरण टेस्लासह मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा, महिंद्र, किआ, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसारख्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आखले आहे.
भारतीय बाजारपेठेत टेस्लाचे वाहन कधी येणार?
टेस्ला भारतीय बाजारात अधिकृतपणे कधी उतरणार याची अजून स्पष्टता नाही, पण मस्क यांच्या भारत दौऱ्यानंतर आणि मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर टेस्लाची ईव्ही वाहने लवकरच भारतीय रस्त्यांवर दिसण्याची शक्यता आहे!