तंत्रज्ञान क्षेत्रातील सुरू असलेल्या कपातीच्या मालिकेला आता आणखी मोठा धक्का बसला आहे. एचपीने २०२८ पर्यंत तब्बल ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तर अॅपलनेदेखील आपल्या विक्री विभागातील अनेक पदे शांतपणे रद्द केली आहेत. यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरी सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एचपीचे सीईओ एनरिक लोरेस यांच्या मते, ही कपात एआय-आधारित पुनर्रचना योजनेचा भाग असून उत्पादन विकास, ग्राहक सेवा आणि ऑपरेशन्सवर थेट परिणाम होणार आहे. कंपनी पुढील तीन वर्षांत जवळपास एक अब्ज डॉलरची खर्च बचत करण्याच्या तयारीत आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातील २,००० कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर आता नव्या निर्णयाने कर्मचाऱ्यांची भीती अधिक वाढली आहे.
दुसरीकडे, अॅपलने आपल्या विक्री संघातील अकाउंट मॅनेजर्स आणि ब्रीफिंग सेंटर कर्मचाऱ्यांची पदे रद्द केली आहेत. कंपनीने सांगितले आहे की ही पुनर्रचना ग्राहक अनुभव अधिक प्रभावी बनवण्यासाठी केली जात आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनीत इतर विभागात अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
Layoffs.fyi च्या अहवालानुसार, २०२५ मध्ये आतापर्यंत २१८ कंपन्यांनी १.१२ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. अमेझॉन, इंटेल आणि टीसीएससारख्या दिग्गजांनीही एआय आणि ऑटोमेशनमुळे मोठ्या प्रमाणात कपाती केल्या आहेत. महामारीनंतरचे ओव्हरहायरिंग, वाढलेले खर्च आणि एआय गुंतवणुकीमुळे पारंपारिक भूमिका झपाट्याने संपुष्टात येत आहेत.
वाढत्या एआय वापरामुळे कंपन्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये अधिक उत्पादनक्षम होऊ लागल्या आहेत. परिणामी, एकेकाळी सुरक्षित वाटणाऱ्या आयटी नोकऱ्या आता अस्थिर बनताना दिसत आहेत. पुढील काही वर्षांत ही कपात लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Comments are closed.