राज्यातील आदिवासी बहुल १३ जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रात तब्बल १७,०३३ शिक्षक पदे रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिक्षण आयुक्तांनी २४ जुलै २०२३ रोजी पाठवलेल्या पत्रातून ही गंभीर परिस्थिती उघड झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्त्या ठप्प असल्याने या भागातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. पेसा क्षेत्रातील हजारो शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः थांबले आहे.
शिक्षक भरतीची गंभीर स्थिती :
२०२२-२३ च्या आकडेवारीनुसार पेसा क्षेत्रात ११,४०० पदे रिक्त असून, अनुसूचित जमाती प्रवर्गातील तब्बल १७,०३३ पदे भरायची बाकी आहेत. २०२३ मधील शिक्षक पात्रता परीक्षेत सहभागी झालेल्या ७,१६६ उमेदवारांपैकी फक्त १,५४४ आदिवासी उमेदवार सध्या मानधनावर कार्यरत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश :
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पात्र एसटी उमेदवारांना तात्काळ कायम नियुक्ती द्यावी असा आदेश दिला. पात्र उमेदवार नसल्यास बी.एड./डी.एड. असणाऱ्या उमेदवारांना नियुक्त करून त्यांना टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ५ वर्षांची मुदत देण्याची तरतूदही केली.
पेसा क्षेत्रातील जिल्हे : ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे आणि अहमदनगर.
आजही हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतिक्षेत असून, शिक्षणाचा हक्क कागदोपत्रीच मर्यादित राहिला आहे, ही खंत स्थानिक समाजातून व्यक्त होत आहे.

Comments are closed.