राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पगारपत्रकांवर पुढील दोन दिवसांत सह्या करण्याचा निर्णय झाल्यामुळे शिक्षक–शिक्षकेतरांच्या पगाराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सह्या न केल्याने संतप्त झालेल्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र सरकारकडून अधिकाऱ्यांच्या संघटनेला बैठकीचे आश्वासन मिळाल्याने, येत्या दोन दिवसांत पगारपत्रकांवर सह्या केल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गतवर्षापासून राज्यभरात बोगस मान्यता व बोगस शालार्थ आयडी प्रकरणांची ‘एसआयटी’मार्फत तपासणी सुरू आहे. या तपासणीत अनेक गैरप्रकार उघडकीस आले असून काही अधिकाऱ्यांना अटक, तर अनेकांना निलंबित करण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान पगारपत्रकांवर सह्या केल्यामुळे काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने, अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने सह्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. निरपराध अधिकाऱ्यांवर शहानिशा न करता कारवाई होत असल्याचा आरोप संघटनेने केला होता.
या परिस्थितीमुळे राज्यभरातील लाखो शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे लक्षात घेऊन अखेर अधिकाऱ्यांनी पगारपत्रकांवर सह्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या सह्या झाल्यानंतर शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्य सरकारकडून राजपत्रित अधिकारी संघाला बैठकीबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, लवकरच बैठक होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डिसेंबर महिन्यात यवतमाळ येथील एका अधिकाऱ्याला याच कारणावरून अटक झाल्यानंतर सह्यांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र शिक्षक–शिक्षकेतर संघटनांनी या प्रकाराला तीव्र विरोध करत अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
शिक्षकांना अशा प्रकारे त्रास दिला गेल्यास सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर या दबावानंतर शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Comments are closed.