जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मध्येच होत असल्याने अध्यापनात व्यत्यय येतो आणि त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षकांच्या बदल्या ३१ मेपूर्वीच पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना स्थिर शिक्षक मिळणार आहेत.

या प्रक्रियेत प्रथम संचमान्यतेनुसार रिक्त व अतिरिक्त पदांवर शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. पटसंख्या घटल्यामुळे जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यांचे आधी समायोजन होईल. त्यानंतर उर्वरित रिक्त राहिलेल्या पदांची जातसंवर्गनिहाय बिंदुनामावली तयार करून प्रथम जिल्हांतर्गत बदल्या राबविल्या जातील.
सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे २,७७५ शाळांमध्ये साडेआठ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. यंदा विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने काही शिक्षक अतिरिक्त ठरले असून, संचमान्यता अंतिम झाल्यानंतर त्यांचे नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर बदलीपात्र शिक्षकांकडून पसंती मागवून पारदर्शक पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.
दरम्यान, २० ते २५ वर्षांपासून परजिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची संधी देण्याचीही शक्यता आहे. जूनपूर्वी राज्यात सुमारे १० हजार शिक्षकांची नवीन भरती होणार असल्याने रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांमध्ये नवे शिक्षक नियुक्त करता येणार आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा मार्ग काही प्रमाणात मोकळा होण्याची शक्यता आहे.
संचमान्यता अंतिम झाल्यानंतर बिंदुनामावलीनुसार बदल्यांची कार्यवाही सुरू होईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परजिल्ह्यांत नोकरी करणाऱ्या हजारो शिक्षकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असून, पती-पत्नी एकत्रीकरण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या दृष्टीनेही ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

Comments are closed.