जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सध्या शिक्षकांच्या तब्बल ८५ जागा रिक्त आहेत. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की काही ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिकवणं देखील अवघड झालंय. ही रिक्त पदं पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षकांकडून तात्पुरत्या स्वरूपात सांभाळली जात आहेत, मात्र त्यांच्यावर असलेला भार दिवसेंदिवस वाढतोय. तब्बल १२ वर्षांनंतर तालुक्याला मिळालेला गटशिक्षणाधिकारीही प्रशासकीय समस्यांसमोर उभा आहे.

१६ हजार विद्यार्थ्यांना ९६५ शिक्षकांचीच साथ!
जुन्नर तालुक्यात सुमारे १६,३१८ विद्यार्थी शिकत आहेत, त्यांच्यासाठी केवळ ९६५ शिक्षक कार्यरत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा यावर परिणाम होतो आहे. शिक्षकांच्या संघटनांनी हे पदं तात्काळ भरावीत, अशी जोरदार मागणी केली आहे. कारण शिक्षणाच्या मूलभूत हक्कावरच गदा येते आहे.
केंद्रप्रमुख नसल्यामुळे कामाची जबाबदारी वाढली
तालुक्यात केंद्रप्रमुखांच्या २५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे काही केंद्रांवर पदवीधर शिक्षकांना, तर काही ठिकाणी उपशिक्षकांना केंद्रप्रमुखपदाचा तात्पुरता पदभार दिला आहे. पण त्यामुळं त्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतो आहे. शिक्षक हे वर्गात असावेत, पदभार सांभाळत बसायला नको – ही वस्तुस्थिती आहे.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या जागाही अपुऱ्या
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या एकूण १० जागांपैकी ६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे उरलेल्या फक्त ४ अधिकाऱ्यांनाच १० बीटचं काम सांभाळावं लागतं. यामुळे कामाचा दर्जा कमी होतो, आणि शाळांमधील निरीक्षण, शैक्षणिक नियंत्रण अशा गोष्टी ढासळतात. शाळेच्या नियोजनावर याचा थेट परिणाम होतो.
शासनाकडून तत्काळ निर्णय आवश्यक
राज्य शासनाने केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५०% पदे पदोन्नतीने, आणि उर्वरित ५०% पदे सरळसेवेने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांनी केली आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे लेखी मागणी केली गेली आहे. शिक्षक संघटनांनी सातत्याने आवाज उठवला असला तरी अद्याप कारवाई झाली नाही.
बदल्यांच्या आधी रिक्त पदं भरली असती तर…
सध्या शासन शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गुंतलेलं आहे, पण त्याआधी जर ही रिक्त पदं भरली असती, तर अनेक शिक्षकांना पदोन्नती मिळाली असती. शिवाय बदल्यांसाठी देखील जागा उपलब्ध झाल्या असत्या. आज मात्र अनेक शिक्षकांना अतिरिक्त शिक्षक म्हणून गणलं जातंय. त्यामुळे बदल्यांचा उद्देशही धोक्यात आलाय.
जुन्नर तालुक्याची थोडक्यात शैक्षणिक आकडेवारी (२०२५)
जुन्नर तालुक्यात सध्या ३५० प्राथमिक शाळा आणि ३२ शैक्षणिक केंद्रे कार्यरत आहेत. एकूण १०५० मंजूर पदांपैकी केवळ ९६५ शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून, ८५ पदे अजूनही रिक्त आहेत. यामध्ये गटशिक्षणाधिकारीचे पद भरलेलं असलं तरी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची १० पैकी फक्त ४ पदे कार्यरत आहेत, तर उर्वरित ६ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे ३२ केंद्रप्रमुख पदांपैकी केवळ ७ पदांवर अधिकारी कार्यरत असून, २५ केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापकांची १५ पदे, पदवीधर शिक्षकांची ४ पदे, आणि उपशिक्षकांची तब्बल ३५ पदे रिक्त आहेत. सहाय्यक व परिचरांची सर्व पदे सध्या कार्यरत आहेत. एकूण शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची टंचाई ही शैक्षणिक व्यवस्थेसमोरील एक गंभीर अडचण ठरली आहे. त्यामुळे त्वरित भरती ही काळाची गरज ठरते आहे.
शिक्षक संघटनांचा इशारा – वेळेत भरती न झाल्यास आंदोलन अटळ
“बरं होणार की नाही माहित नाही, पण शिक्षक बदल्यांच्या मागे शासन गुंतलेलं असताना वास्तविक अनेक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांची पदं अजून रिक्त आहेत. या सगळ्याच पदांमुळे खालच्या स्तरावर गोंधळ माजलाय. ही पदं भरली गेली असती, तर शिक्षकांचा भार कमी झाला असता. बदल्या देखील सुरळीत पार पडल्या असत्या”
— तानाजी तळपे, माजी सरचिटणीस, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ
